मनाचे श्लोक आणि पूर्वस्मृती हीलींग

श्री रामदास स्वामी आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. मनाचे श्लोक, दासबोध वगैरे त्यांच्या रचना आपण वाचलेल्या ही आहेत. काहींनी त्याचा अभ्यासही केला असेल. शिवाजी महाराजांचे समकालीन श्री रामदास स्वामी हे अध्यात्माच्या बरोबरीने समाजकारण करणारे होते. निराशेने भरलेल्या समाज मनाला उभारी देण्यासाठी, दिशा देण्यासाठी त्यांनी ‘मनाच्या श्लोकांची’ निर्मिती केली.

मन, मनाची शक्ती, त्यात असणाऱ्या विचारलहरींचं महत्त्व जनसामान्यांना कळण्यासाठी, एवढंच नव्हे तर ही मनाची विचारांची ताकद सावधानपणे कशी वापरावी याचंही मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी या श्लोकांची रचना केली आहे.

मनातील विचारांना होडीच्या शिडाची उपमा दिली तर वावगं ठरू नये. शिडाची दिशा तीच होडीची दिशा, मग हे शीड योग्य दिशेला ठेवलं तर जीवनाची नौका सन्मार्गाला लागते. तद्वतच मनातील विचारच नव्हे तर त्या विचारांमधील भावभावनांची स्पंदनशक्ती ही तुमच्या मनाच्या शक्ती वर काम करते याची जाणीव ‘मनाचे श्लोक’ वाचताना आपल्याला प्रत्येक श्लोकातून होत असते.

मनातील विचार हे भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ या तिन्ही काळांसंबंधित असतात. या विचारांवर प्रामुख्याने प्रभाव असतो तो पूर्वस्मृतींचा. पूर्वस्मृती आपण भूतकाळात घडलेल्या घटना नुसार विविध प्रकारांनी तर्कबुद्धी लढवत असते. या तर्कानुसार आपली विचार करायची पद्धत, विश्वास, श्रद्धा, मत, समजुती तयार होत असतात आणि या सगळ्या विचारधारेत आपलं व्यक्तिमत्व, आपल्या जीवनाची दिशा, यशापयश सुख-दुःख यांचा आलेख ठरतो. म्हणूनच रामदास स्वामींनी ‘मनाचे श्लोक’ लिहिले. शरीराकरिता श्लोकरचना केली नाही.

मला मधील इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू. या दोन्ही मनाच्या शक्ती तुमच्या शारीरिक उर्जेवर रही काम करतात आणि याच इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्तीवर नियंत्रण ठेवते आपली पूर्वस्मृती. मनातील इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती योग्यप्रकारे वापरली तर आपण जे हवं ते प्राप्त करू शकतो. सन्मार्गाने प्राप्त करू शकतो. पण हीच इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती आपल्या मनात दुर्बलता, असहायता, निराशा, निर्माण करत राहिली तरमात्र आपली गाडी गडगडायला वेळ लागणार नाही. म्हणूनच मुळावर काम करायचं असेल तर पूर्वस्मृतींमधील भावभावनांचं नियंत्रण करणे गरजेचं आहे. त्यावेळेच्या समाजमनात निर्माण झालेलं औदासीन्य, दुर्बलता, असहायता दूर करून समाजमनामध्ये ताकद येण्यासाठी, शिवाजी महाराजांच्या कार्याला ताकद देणारं, सकारात्मकता देणारं समाजमन तयार करण्यासाठी रामदासस्वामींनी अभ्यासपूर्वक, जाणीवपूर्वक या श्लोकांची निर्मिती केली.

सगळीकडेच समाजात मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असतानाच सध्या कोरोनाच्या या संकटाने पूर्ण समाजमन पुन्हा एकदा दुर्बल, असहाय, निराश, उदास झालं आहे. तेव्हा याच काळात समर्थांनी लिहिलेल्या ‘मनाच्या श्लोकांचा’ आधार घेत ‘पूर्वस्मृती हीलींग पद्धतीचे’ महत्त्व, गरज आणि आवश्यकता समाज मनाला पटवून द्यावी अशी प्रेरणा माझे गुरु गोंदवलेकरमहाराज यांच्या कडून आल्याने मी हा प्रयत्न करणार आहे. चला तर मग ‘पूर्वस्मृती हीलिंग पद्धती’ चा गाभा ‘मनाच्या श्लोकां’च्या आधारे समजून घेऊया.