गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंत या राघवाचा ||

गमू पंथ आनंत या राघवाचा.
राघवाचा पंथ म्हणजे पाथ जाणून घेऊया. राघवाचा पंथ/पाथ म्हणजेच राघवाच्या प्राप्तीचा मार्ग. राघव म्हणजे मूर्तिमंत आनंद, समाधान, शांती, सुख असं बरंच काही. ज्या आनंदाला, सुखाला शब्दांच्या वर्णनात सामावता येत नाही असा हा असीम आनंद म्हणजेच राघव.
हा असीम आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात आहे. आपण निसर्गाचाच भाग असल्याने निसर्गातील प्रत्येक कणात असणारा आनंद आपल्यातही आहे. मग तो हरवतो कसा ? आज आत्ता या क्षणी कुणालाही विचारलं तर आनंदाच्या शोधात प्रत्येकजण आहे, असंच लक्षात येईल. मग तरीही तो आनंद आपल्याला बरेचवेळा, बऱ्याच बाबतीत धोका देतो. असं का होतं ते जाणून घेऊया.
‘पूर्वस्मृती हीलिंग पद्धती’ ह्या हीलिंग पद्धतीचा मागोवा समर्थ रामदासस्वामींच्या ‘मनाच्या श्लोकां’च्या आधाराने मांडायचा हा प्रयत्न करायचं धारिष्ट्य मी केवळ माझे सद्गुरु गोंदवलेकरमहाराज ह्यांच्या प्रेरणेने करीत आहे.
समर्थांनी मनाचं, मनाच्या शक्तीचं आणि त्यात सतत विहरणाऱ्या विचारलहरींचं पथदर्शक ज्ञान ‘मनाच्या श्लोकां’च्या माध्यमातून मांडलं आहे. त्याच मनातील विचारलहरींचं आणि त्यावर प्रभाव पाडणाऱ्या पूर्वस्मृतींचं महत्त्व विषद करण्यासाठी ‘मनाच्या श्लोकां’चा आधार घेत पुढे पुढे जाणं हेच मला जमू शकेल. म्हणूनच प्रत्येक श्लोकाचं विश्लेषण मी ‘पूर्वस्मृती हीलिंग पद्धती’च्या दृष्टिकोनातून करणार आहे.
या राघवाचं अस्तित्व प्रत्येकाच्या मनात आहेच. महाराज म्हणतात, ‘प्रत्येकाच्या मनात आत्माराम आहे’. म्हणूनच विकार, वासना ह्यांची नकारात्मकता नष्ट करून त्या ठिकाणी सकारात्मक विचारांची, भावनांची पेरणी केली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, हे कसं करायचं ? समर्थ म्हणतात, ‘त्याकरिता गमु पंथ आनंत या राघवाचा’. चला, हा मार्ग काय आहे ते जाणून घेऊया.
स्मृती म्हणजे काय तर साध्या भाषेत आठवण. पूर्वस्मृती म्हणजे पूर्वीची/भूतकाळातील अनुभवांवर आधारित असलेली स्मृती.
ही स्मृती सूक्ष्म रूपाने मनात वास करत असते आणि हीच स्मृती स्थूल रूपाने मेंदूच्या पेशींमध्ये साठलेली असते. पाच इंद्रियांद्वारे येणाऱ्या अनुभवांतून जमवलेली माहिती, त्या माहितीवर आधारित आपल्या समजुती, विश्वासप्रणाली, मत, दृष्टिकोन, विचारधारा, भावनांच्या संवेदना म्हणजेच आपली स्मृती. काही अल्पकाळ टिकणाऱ्या स्मृती असतात, तर काही दीर्घकाळ टिकणाऱ्या. ह्या स्मृती म्हणजेच तुमचं व्यक्तिमत्त्व. इतकं महत्त्व ह्या स्मृतींचं आहे. ह्या स्मृती आणि आपल्या मनातील विचार ह्यांचं अतुट नातं आहे.
आपल्या मनात उमटणाऱ्या विचारांचं वर्गीकरण करायचं झालं तर ते तीन गुणांनी युक्त असतात. काही विचार सत्त्वगुणांनी युक्त असतात, ज्यात प्रेम, जिव्हाळा, सात्विकता, उदारता, शांतता अशा भावना असतात. तर काही विचार रजोगुणांनी युक्त असतात. म्हणजे ते सतत इच्छापूर्तीकरिता धावायला लावतात. इच्छा पूर्ण होईपर्यंत ते असहायता, बेचैनी निर्माण करतात. एक इच्छा पूर्ण केली की दुसरीला मागे लावतात. तर काही विचार हे तमोगुणी म्हणजेच राग, द्वेष, मत्सर असणाऱ्या भावनांनी प्रेरित असतात. प्रत्येकाच्या मनात उमटणारे विचार हे फक्त सात्विक, फक्त राजसी किंवा फक्त तामसी नसतात. तर प्रत्येकाच्या विचारांमध्ये हे तिन्ही गुण उपस्थित असतात. या तिन्ही गुणांचा स्वामी हा गणेश आहे. त्यामुळे त्या गणेशाला पहिल्यांदा वंदन करूया आणि त्याला विनंती करूया, “बाबा रे, आम्हाला ज्ञान दे. तुझं नियंत्रण या तिन्ही गुणांवर आहे. आम्हाला मात्र विचारांवर नियंत्रण ठेवता येत नाही. आम्ही त्या विचारांमधून डोकावणाऱ्या भावनांच्या ताब्यात स्वत:ला देऊन राहतो. मग आयुष्याचं तारू कुठं भरकटतं ते आम्हाला कळतदेखील नाही. म्हणून तूच आम्हाला ज्ञान दे, जाणीव करून दे. तरच आम्ही योग्य मार्गावर, राघवाच्या पंथावर राहू”.

मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा.
मुळात आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा ‘स्मृती’ नव्हतीच. पूर्वकर्मानुसार स्वभावगुण घेऊन आपण आलो खरे, पण आपल्याला त्याची जाणीव नसल्याने मुळात आपली स्मृती ही शून्यवत होती. स्मृतीचा हा पंथ, पूर्वस्मृतीही आपण जन्माला आलो तेव्हा नव्हती. आपल्याला जन्माला येताना मागचे जन्म, त्यातल्या इच्छा, आकांक्षा, कर्मफळ काहीही आठवत नसतं. म्हणजे आपण जन्माला येतो तेव्हा पूर्वस्मृती निर्गुण असते.

नमु शारदा मूळ चत्वार वाचा.
मुळात शून्यापासून स्मृतीची सुरुवात होते. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे इंद्रियांच्या मार्फत वेगवेगळे अनुभव घेतो. ते अनुभव घेत असताना निर्माण झालेले विचार, तरंग त्यांतील भावनांची संवेदना यांची स्मृती ही सूक्ष्म, अतिसूक्ष्म, स्थूल या स्वरूपात चार वाणींमध्ये साठत राहाते. त्या वाणी अशा आहेत.
मुख्य चार वाणी आहेत.
परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी.
या चारही वाणींचं महत्त्व पूर्वस्मृती हीलिंगच्या दृष्टिकोनातून आपण जाणून घेऊया.

परा : पूर्वजन्मीच्या कर्मफलानुसार आणलेल्या सूक्ष्म रूपातील भावना, तसेच अनेक न जाणवलेल्या विचारांचे तरंग या वाणीत सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असतात.

पश्यंती : परा वाणीपेक्षा थोडी कमी सूक्ष्म अशी पश्यंती. त्या त्या प्रसंगात, त्या त्या अनुभवातून उमटलेल्या विचारलहरी ह्या पश्यंतीत अस्तित्वात असतात.

मध्यमा : वैखरीतून व्यक्त होणाऱ्या आर्थाने विचार निर्माण होतात. ते मध्यमेत असतात. मध्यमा वाणीत असणारे काहीच विचार वैखरीने स्थूलरूपात व्यक्त होतात. जे व्यक्त होत नाहीत ते मध्यमेत राहतात. जिथे विचारलहरींचं वास्तव्य आहे.

वैखरी- या वाणीत आपण आपले विचार ,भावना, मत वगैरे प्रत्यक्ष व्यक्त करतो. तोंडाच्या सहाय्याने ही वाणी व्यक्त होते. या वैखरी वाणीचं रूप स्थूल आहे.

या चारही वाणींची देवी शारदा. त्या शारदेला वंदन करू आणि तिला विनंती करू, “तुझ्या ह्या चारही वाणींत सूक्ष्म ते स्थूलरूपाने वसण्याची, ह्या विचारलहरींची, स्पंदनांची, संवेदनांची ज्ञान/जाणीव गणपती आम्हाला करून देणार आहे. या आमच्या प्रयत्नांना तू तुझे आशीर्वाद दे. सामर्थ्य दे, सहकार्य कर. म्हणजेच माझा आनंदाचा ठेवा मिळविण्यासाठी तू मला सहकार्य कर.
पूर्वस्मृती हीलिंग पद्धतीने आम्ही आमच्या आनंदाचा पंथ मिळविणार आहोत. तरी हे गणपती, तू आम्हाला जाणीव दे, ज्ञान दे आणि शारदे, तू आम्हाला सहकार्य कर. म्हणजे आम्ही आमच्या आनंदाला नक्कीच भेटू”.